4
अरण्यांत येशूची परीक्षा
मत्त. 4:1-11; मार्क 1:12, 13
1 येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरून यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्यास अरण्यात नेले.
2 तेथे सैतानाने त्याची चाळीस दिवस परीक्षा घेतली. त्या दिवसात येशूने काहीही खाल्ले नाही आणि ती वेळ संपल्यानंतर येशूला भूक लागली.
3 तेव्हा सैतान त्यास म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडाची भाकर हो, अशी आज्ञा कर.
4 येशूने त्यास उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.”
5 मग सैतान त्यास उंच जागेवर घेऊन गेला आणि एका क्षणांत जगातील सर्व राज्ये त्यास दाखविली.
6 सैतान त्यास म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व वैभव देईन कारण ते मला दिलेले आहे आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो.
7 म्हणून जर तू मला नमन करशील आणि माझी उपासना करशील तर हे सर्व तुझे होईल.”
8 येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. प्रभू तुझा देव याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर.”
9 नंतर सैतानाने येशूला यरूशलेम शहरास नेले आणि परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर त्यास उभे केले आणि तो त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार!
10 शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा करील,
11 आणि तुझा पाय दगडावर आपटू नये
म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील.’ ”
12 येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असेही म्हणले आहे; तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस.”
13 म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे परीक्षा घेण्याचे संपविल्यावर योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला.
14 मग पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू गालील प्रांतास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली.
15 त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले आणि सर्वांनी त्याची स्तुती केली.
16 मग जेथे तो लहानाचा मोठा झाला होता त्या नासरेथांत तो आला आणि शब्बाथ दिवशी त्यांच्या प्रथेप्रमाणे सभास्थानात जाऊन ग्रंथ वाचण्यासाठी उभा राहिला,
17 आणि यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्यास देण्यात आला. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्याठिकाणी असे लिहिले आहे,
18 “प्रभूचा आत्मा मजवर आला आहे,
कारण, गरिबांना सुवार्ता सांगण्यास
त्याने मला अभिषेक केला आहे.
कैदी म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी,
आणि आंधळ्यांना दृष्टी पुन्हा मिळावी,
ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी
19 आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी
त्याने मला पाठवले आहे.”
20 मग त्याने ग्रंथपट बंद करून सभास्थानाच्या सेवकाला परत करून तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येकजण त्याच्याकडे रोखून पाहत होता.
21 त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली की, “तुमच्या ऐकण्यामुळे आज हा शास्त्रलेख पूर्ण झाला आहे.”
22 तेव्हा सर्व लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले, हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय?
23 येशू त्यांना म्हणाला, “नक्कीच, तुम्ही मलाही म्हण लागू कराल; हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टी तुझ्या स्वतःच्या गावातसुद्धा कर.” मग तो पुढे म्हणाला,
24 “मी तुम्हास खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतःच्या नगरात स्वीकारला जात नाही.
25 मी तुम्हास खरे सांगतो, इस्राएलात एलीयाच्या काळात पुष्कळ विधवा होत्या, जेव्हा साडेतीन वर्षापर्यंत आकाशातून पाऊस पडला नाही आणि सर्व प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता.
26 तरीही एलीयाला इतर कोणत्याही विधवेकडे पाठविण्यात आले नाही. त्यास सिदोन प्रांतातील सारफथ येथील विधवेकडेच पाठविण्यात आले.
27 अलीशा संदेष्ट्याच्या वेळेस इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते परंतु त्यापैकी कोणीही शुद्ध झाला नाही. केवळ सूरीया येथील नामान कुष्ठरोग्यालाच शुद्ध करण्यात आले होते.”
28 हे एकूण सभास्थानातील सर्व लोक संतापले.
29 ते लोक उठले आणि त्यांनी येशूला शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या कड्यावरून त्यास लोटून देण्यास तेथवर नेले.
30 परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला.
भूतग्रस्ताला बरे करणे
मार्क 1:21-28
31 नंतर तो गालील प्रांतातील कफर्णहूम गावी गेला. तो शब्बाथ दिवशी सभास्थानात त्यास शिक्षण देत होता.
32 ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त असे.
33 त्यादिवशी सभास्थानात, अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला,
34 हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे! देवाचा पवित्र! तो तूच आहेस.
35 येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा आणि त्याच्यातून नीघ!” तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्यास जमिनीवर खाली पाडले व त्या मनुष्यास काहीही इजा न करता तो त्याच्यातून बाहेर निघाला.
36 तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्याना देखील आज्ञा करतो व ते बाहेर येतात.
37 अशाप्रकारे त्याच्याविषयीची किर्ती चहुकडील प्रदेशात पसरत गेली.
शिमोनाची सासू व इतर काही रोगी
मत्त. 8:14, 15; मार्क 1:29-31
38 येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू तापाने आजारी होती. त्यांनी तिला बरे करण्याविषयी त्यास विनंती केली.
39 येशू तिच्याजवळ उभा राहिला व त्याने तापाला धमकावले आणि तिच्यातून ताप निघाला. ताबडतोब उठून ती त्यांची सेवा करू लागली.
40 सूर्य मावळत असतांना, निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्या सर्व मनुष्यांना त्याच्याकडे आणले. त्याने प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले.
41 कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, तू देवाचा पुत्र आहेस. परंतु तो ख्रिस्त आहे हे त्यांना माहिती असल्याने त्याने त्यांना दटावले व काही बोलू दिले नाही.
42 दिवस उगवताच, तो एकांत स्थळी गेला. पण लोक त्यास शोधत होते. तो जेथे होता तेथे ते लगेच आले आणि त्यांच्यातून त्याने निघून जाऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले.
43 परंतु तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे कारण याच कारणासाठी मला पाठवले आहे.”
44 मग तो संपूर्ण यहूदीया प्रांतातील सभास्थानामध्ये उपदेश करीत गेला.