9
अहरोनाने केलेली अर्पणे
आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे पुत्र तसेच इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले. तो अहरोनाला म्हणाला, “पापार्पणासाठी एक निर्दोष गोऱ्हा व होमार्पणासाठी निर्दोष मेंढा आण आणि त्यांना परमेश्वरास अर्पण कर. आणि इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा व होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरु आणा; ही दोन्ही प्रत्येकी एक वर्षाची व निर्दोष असावीत; आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी बली म्हणून एक बैल, एक मेंढा व तेलात मळलेले अन्नार्पण आणा कारण आज परमेश्वर तुम्हास दर्शन देणार आहे.” मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व लोक आले व त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दारापाशी आणले मग सर्वजण येऊन परमेश्वरासमोर उभे राहिले.
तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही करावे; मग परमेश्वराचे गौरव तुम्हास दिसेल.” मग मोशेने अहरोनाला सांगितले, “जा व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही कर; वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित कर आणि लोकांकडील बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित कर.”
तेव्हा अहरोन वेदीजळ गेला व त्याने स्वत:साठी पापार्पणाचा गोऱ्हा वधला. मग अहरोनाचे पुत्र रक्त घेऊन त्याच्यापाशी गेले. तेव्हा त्याने आपले बोट त्यामध्ये बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले मग ते वेदीच्या पायथ्याशी ओतले.
10 त्याने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा घेऊन त्यांचा वेदीवर परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणेच होम केला. 11 मग अहरोनाने मांस व कातडे छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले.
12 नंतर त्याने होमबली वधला व त्याचे तुकडे केले; अहरोनाच्या मुलांनी त्या होमबलीचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले. 13 नंतर अहरोनाच्या मुलांनी होमबलीचे तुकडे व त्याचे डोके अहरोनाकडे दिले आणि त्याने त्यांचा वेदीवर होम केला. 14 त्याने त्याची आतडी व पाय धुवून त्यांचाही वेदीवर होम केला.
15 मग त्याने लोकांचे अर्पण जवळ नेले व त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणेच तोसुध्दा पापार्पण म्हणून अर्पिला. 16 त्याने होमबलीही जवळ नेऊन परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तो अर्पिला. 17 मग त्याने अन्नार्पण वेदीजवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन दररोज सकाळच्या होमार्पणासह तेही अर्पण केले.
18 लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेला बैल व मेंढा हे त्याने वधले आणि त्याच्या मुलांनी त्या बलींचे व मेंढ्याचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले. 19 अहरोनाच्या मुलांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा ही सर्व अहरोनाकडे आणली.
20 त्यांनी ती सर्व चरबी त्या बलींच्या ऊराच्या भागावर ठेवली; मग अहरोनाने त्या सर्वाचा वेदीवर होम केला. 21 अहरोनाने बलींचे ऊर व उजवी मांडी ही मोशेच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली.
22 मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण, होमार्पण, व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला. 23 मोशे व अहरोन दर्शनमंडपामध्ये गेले आणि बाहेर आल्यावर त्यांनी लोकांस आशीर्वाद दिला; तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांस दिसले; 24 तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.