10
रुप्याचे कर्णे
1 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2 चांदीचे दोन कर्णे बनव. चांदी ठोकून ते बनव. मंडळीला एकत्र बोलवण्यासाठी आणि त्यांचा तळ हलविण्यासाठी या कर्ण्यांचा उपयोग करावा.
3 सर्व मंडळीला दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र बोलविण्यासाठी याजकाने कर्णे वाजवावे.
4 जर याजकाने एकच कर्णा वाजविला तर मग अधिकाऱ्यांनी, इस्राएलांच्या वंशाच्या अधिपतीनी तुझ्याकडे जमावे.
5 जेव्हा तू कर्णा मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे पूर्वेकडील छावण्यांनी त्यांचा प्रवासास सुरवात करावी.
6 जेव्हा दुसऱ्या वेळी मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे तेव्हा दक्षिणेकडील छावण्यांनी प्रवासास सुरवात करावी; त्यांच्या प्रवासासाठी मोठ्याने फुंकून इशारा द्यावा.
7 जेव्हा मंडळीला एकत्र जमावावयाचे असेल तेव्हा कर्णा फुंका, पण मोठ्याने फुंकू नये.
8 अहरोनाचे मुले, याजक, यांनीच कर्णे वाजवावीत. हा तुमच्या लोकांस पिढ्यानपिढ्याचा कायमचा नियम आहे.
9 तुम्ही जेव्हा तुमच्या देशात तुम्हावर जुलूम करणाऱ्या शत्रूविरूद्ध लढायला जाता, मग तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. मी, परमेश्वर, तुमचा देव तुमची आठवण करीन आणि तुमच्या शत्रूपासून तुमचे रक्षण करील.
10 तसेच तुम्ही आनंदाच्या प्रसंगी, तुमचे दोन्ही नियमीत सण व महिन्याच्या सुरवातीच्या दिवशी तुमची होमार्पणाच्या, शांत्यर्पणाच्या यज्ञांच्या सन्मानासाठी तुम्ही कर्णे वाजवावेत. तुमच्या परमेश्वरास तुमची आठवण करून देण्याची ही एक कृती आहे. हे तुम्ही करावे अशी मी तुम्हास आज्ञा देतो. मी तुमचा देव परमेश्वर आहे.
इस्त्राएल लोक सीनाय रान सोडून निघतात
11 दुसऱ्या वर्षी, दुसऱ्या महिन्यात, महिन्याच्या विसाव्या दिवशी, साक्षपटाच्या निवासमंडपापासून ढग वर घेतला गेला.
12 तेव्हा इस्राएल लोक सीनाय रानातून आपल्या प्रवासास निघाले. ढग पारानाच्या रानात थांबला.
13 परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी हा पहिला प्रवास केला.
14 पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीच्या निशाणाखालील त्यांच्या वैयक्तिक सैन्यासह बाहेर निघाले. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन यहूदाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
15 सुवाराचा मुलगा नथनेल इस्साखार वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
16 हेलोनाचा मुलगा अलीयाब जबुलून वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
17 गेर्षोन व मरारी वंश निवासमंडपाची काळजी घेण्यासाठी होते, त्यांनी निवासमंडप खाली काढला आणि मग तो उचलून घेऊन त्यांच्या प्रवासास सुरवात केली.
18 त्यानंतर, रऊबेनाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी त्यांच्या प्रवासास सुरवात केली. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
19 सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल शिमोन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
20 रगुवेलाचा मुलगा एल्यासाप गाद वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
21 कहाथींनी प्रवासास सुरवात केली. ते पवित्रस्थानातील पवित्र वस्तू घेऊन निघाले. ते पुढच्या तळावर जाऊन पोहोचेपर्यंत अगोदरच्या इतरांनी पवित्र निवासमंडप उभा करून तयार ठेवला होता.
22 त्यानंतर एफ्राइम वंशाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी प्रवासास सुरवात केली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
23 पदाहसुराचा मुलगा गमलीयेल मनश्शे वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
24 गिदोनीचा मुलगा अबीदान बन्यामीन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
25 दान वंशाच्या निशाणाखालील सैन्यांची शेवटची छावणी होती. अम्मीशाद्दै चा मुलगा अहीएजर दान वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
26 आक्रानाचा मुलगा पगीयेल आशेर वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
27 एनानाचा मुलगा अहीरा नफताली वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
28 ह्याप्रकारे इस्राएल लोकांचे सैन्य त्यांच्या प्रवासास सुरवात करीत.
29 मोशेने आपला सासरा मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याच्याशी बोलला. रगुवेल मोशेच्या पत्नीचा पिता होता. मोशे होबेबाशी बोलला व म्हणाला, “परमेश्वराने वर्णन केलेल्या देशात आम्ही जात आहोत. तो देश देण्याचे परमेश्वराने आम्हास वचन दिले आहे. तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुझे चांगले करू. परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी चांगले करण्याचे वचन दिले आहे.”
30 परंतु होबाबाने उत्तर दिले “मी तुमच्याबरोबर येणार नाही. मी माझ्या देशात व माझ्या स्वतःच्या लोकात जाईल.”
31 मग मोशेने त्यास उत्तर दिले, “कृपा करून तू आम्हास सोडून जाऊ नको. तुला रानात कसा तळ द्यायचा हे माहित आहे. तू आमचा वाटाड्या हो.
32 तू जर आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर जे काही आमचे चांगले करील तेच आम्ही तुझे करू.”
33 परमेश्वराच्या पर्वतापासून तीन दिवसाचा प्रवास करीत गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्यासाठी जागा शोधायला तीन दिवसाच्या वाटेवर त्यांच्यापुढे गेला.
34 जसा ते प्रवास करत होते तसा परमेश्वराचा ढग दिवसरात्र त्यांच्यावर होता.
35 जेव्हा कराराचा कोश प्रवासास निघत तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, ऊठ, तुझ्या शत्रूंची पांगापांग कर, जे तुझा द्वेष करतात ते तुझ्यापासून पळून जावोत.”
36 जेव्हा कराराचा कोश थांबत असे, तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या लाखो लोकांकडे परत ये.”