7
देवाचा दाविदाशी करार
1 इति. 17:1-15
1 राजा दावीद आपल्या नवीन घरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास भोवतालच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिला.
2 एकदा नाथान या संदेष्ट्यास दावीद म्हणाला, “इथे मी गंधसरुच्या लाकडापासून केलेल्या डौलदार घरात राहतोय आणि देवाचा कोश मात्र अजूनही राहुटीतच आहे. त्या पवित्र कोशासाठी आता चांगला निवारा बांधायाला हवा.”
3 नाथान राजाला म्हणाला, “आपल्या मनात आहे तसे करा. परमेश्वराची तुम्हास साथ आहे.”
4 पण त्याच दिवशी रात्री नाथानला परमेश्वराचे वचन ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,
5 “दावीद या माझ्या सेवकाला जाऊन सांग, ‘परमेश्वराचा निरोप असा आहे: माझ्यासाठी निवासस्थान बांधणारा तू नव्हेस.
6 मी इस्राएल लोकांस मिसरमधून बाहेर काढले त्यावेळी कुठल्या ही घरात राहत नव्हतो, मी राहुटीतूनच फिरलो. तेच माझे घर.
7 इस्राएल लोकांबरोबर मी जेथे जेथे गेलो, त्या त्या ठिकाणी, माझ्या इस्राएल लोकांचे मेंढपाळ व्हा म्हणून ज्यांना मी सांगितले त्या इस्राएल वंशातील कोणात्याही अधिकाऱ्याला “कधीही माझ्यासाठी तू गंधसरूचे, घर का बांधले नाहीस?” असे विचारले नाही.
8 शिवाय दावीदाला हे ही सांग सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, “तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा राजा केले.
9 तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे मी तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन.
10 माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली, त्यांना रुजवले त्यांना जागोजागी भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले.
11 इस्राएल लोकांवर मी, परमेश्वर, शास्ते नेमिले होते तेव्हापासून दुर्जनांनी त्यांना त्रास दिला तसे आता घडणार नाही. तुझ्या सर्व शंत्रूपासून मी तुला शांती देतो. मी तुला असे अभिवचन देतो की, तुझे घराणे कायमचे राजघराणे होईल.
12 तुझे जीवन संपुष्टात आले, म्हणजे तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या पुत्रापैकीच एकाला राजा करीन.
13 तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन.
14 मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर मी त्यास मनुष्याच्या काठीने आणि मनुष्यांच्या पुत्रांच्या चाबकांनी शासन घडवीन.
15 पण माझे त्याच्यावरचे प्रेम खंडित होणार नाही. त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहील. शौलावरील माझा लोभ आणि प्रेम संपुष्टात आले. मी तुझ्याकडे वळलो, तेव्हा तुझ्यासमोर मी त्यास दूर ढकलले. पण तुझ्या घराण्याच्या बाबतीत मी असे करणार नाही.
16 राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे राजासन टिकून राहील.”
17 नाथानाने दावीदाला हा दृष्टांत आणि देवाचे सर्व बोलणे ऐकवले.
18 यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस?
19 हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्याच काळाचे सांगून ठेवले आहेस; प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहेस.
20 मी आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच.
21 तू करणार म्हणालास, आणि तुला तसे करायची इच्छा आहे; तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस.
22 ह्यास्तव हे माझ्या प्रभू, परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही.
23 पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. ती गुलाम होती, तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुक्त केलेस. तिला आपली प्रजा बनवलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भूत चमत्कार केलेस.
24 तू निरंतर इस्राएलाला स्वतःच्या कवेत घेतलेस. हे परमेश्वरा तू त्यांचा देव झालास.
25 आता तर परमेश्वर देवा, तू या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करून तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करू दे.
26 मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, सर्वशक्तिमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला तुझा सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे.
27 सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस तू म्हणालास, मी तुझ्यासाठी घर बांधीन, म्हणून मी तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे.
28 प्रभू परमेश्वरा, तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत, तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास.
29 आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभू परमेश्वरा, तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”